परिचय

श्रीपाद ब्रह्मे (लेखक-पत्रकार) ‚
(पत्रकारितेत २५ वर्षे पूर्ण...)‚
वृत्तसंपादक,
महाराष्ट्र टाइम्स‚ पुणे आवृत्ती
टाइम्स हाउस‚ ५७७‚ शिवाजीनगर‚
नामदार गोपाळ कृष्ण गोखले रोड (फर्ग्यसन रोड)‚ पुणे- ४

जन्म  –  १४ नोव्हेंबर १९७५, जामखेड ⟨जि. नगर)
शिक्षण - बी. ए. बी. सी. जे. ⟨पत्रकारितेची डिग्री⟩
प्रकाशित पुस्तके -
कॉफीशॉप ⟨ललित लेखसंग्रह⟩ ⟨काँटिनेन्टल प्रकाशन⟩,
फर्स्ट डे फर्स्ट शो ⟨चित्रपट परीक्षणांचा संग्रह⟩ ⟨चपराक प्रकाशन⟩
यक्षनगरी ⟨चित्रपटविषयक लेखांचा संग्रह⟩ ⟨समदा प्रकाशन⟩
एम. एस. धोनी : जिद्दीचा षटकार ⟨लहान मुलांच्या सुपरहिरो सीरीजमधील पुस्तक⟩ ⟨मनोविकास प्रकाशन⟩

१.   नोव्हेंबर १९९४ पासून दै. ‘लोकसत्ता’च्या नगर आवृत्तीमधून पत्रकारितेस सुरुवात. सुरुवातीला मुद्रितशोधक म्हणून काम केले.

२.  एक सप्टेंबर १९९७ पासून पुण्यात दै. ’सकाळ’मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून रुजू. नंतर उपसंपादक म्हणून कायम. सकाळमध्ये पुढील १३ वर्षे काम केले. मुख्य उपसंपादक पदापर्यंत वाटचाल.

३.  १५ नोव्हेंबर २०१० पासून ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीत मुख्य उपसंपादक म्हणून रुजू. सध्या उपवृत्तसंपादक (डेप्युटी न्यूज एडिटर) म्हणून कार्यरत.

४.  मुख्यत्वे सिनेमांची परीक्षणं आणि साहित्य-सांस्कृतिक विषयांचे वार्तांकन

५.  सकाळ आणि ‘मटा’मध्ये मिळून ३०७ सिनेमांची परीक्षणे प्रसिद्ध. आता नुकतेच ते काम स्वतःहून थांबविले आहे.

६.  बेळगाव (१९९९), कराड (२००३), औरंगाबाद (२००४), सोलापूर (२००६), पुणे (२०१०), सासवड (२०१४) या साहित्य संमेलनांचे वार्तांकन.

७.  लोकसभा निवडणुकांच्या वार्तांकनासाठी तमिळनाडू (२००१) व ओडिशा (२००४) राज्यांचे दौरे.

८.  ‘सकाळ’मार्फत २००७ मध्ये पर्यटन अभ्यासासाठी थायलंडचा दौरा

९.  ‘सकाळ’मध्ये कॉफीशॉप हे साप्ताहिक सदर (दर रविवारी) साडेतीन वर्षे लिहिले.

१०.  ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये टी-टाइम हे साप्ताहिक सदर (दर रविवारी) चार वर्षे सलग लिहिले.

११.  याशिवाय दोन्ही वृत्तपत्रांतून सिनेमे, समाजकारण, माध्यमे आदी विषयांवर अनेक लेख, मुलाखती.

१२.  विविध दिवाळी अंकांतून, नियतकालिकांतून प्रासंगिक ललित, विनोदी शैलीतील लेखन प्रसिद्ध.

१३.  गोवा, पुणे यांसह अनेक चित्रपट महोत्सवांना सातत्याने हजेरी आणि त्यावर लिखाण.

१४.  आकाशवाणीवर प्रासंगिक लेखन आणि सादरीकरण.

१५.  सिडनी आकाशवाणीवर साडेसहा वर्षे भारत डायरी हा लोकप्रिय कार्यक्रम सादर केला.


१६.  http://brahmevakya.blogspot.in या स्वतःच्या ब्लॉगवर भरपूर स्फुट लेखन प्रसिद्ध.

१७.  पुरस्कार -
अ) पुण्यातील अशोक फाउंडेशनचा युवा पत्रकारिता पुरस्कार.
आ) जामखेड येथील लक्ष्मणराव देशमुख स्मृती पुरस्कार.
इ) अखिल भारतीय मध्यवर्ती ब्राह्मण संस्थेचा युवामंत्र पुरस्कार.
ई) ‘टी टाइम’ पुस्तकाला विनोद विद्यापीठ या संस्थेचा सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तकाचा पुरस्कार
ए) 'रोटरी क्लब, औंध'तर्फे २०२३ मध्ये व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार

पुस्तके

टी-टाईम

‘टी-टाइम’मधील लेखन वाचून अनेकांना ‘कॉफीशॉप’ची आठवण येईल. दोन्ही सदरांची जातकुळी अगदी एकच असली, तरी मला स्वतःला ‘टी-टाइम’मधील लेख वेगळे वाटतात. माणूस म्हणून, लेखक म्हणून माझ्यात झालेली वाढ या नव्या सदरात जाणवेल. शिवाय हल्ली दर पाच वर्षांनी पिढी बदलते, असं म्हणतात. त्याही अर्थानं‘कॉफीशॉप’च्या वेळी असलेलं जग आणि ‘टी-टाइम’लिहितानाच्या वेळचं जग यात निश्चितच बदल झालेला दिसेल. विशेषतः तंत्रज्ञानातील बदल फारच प्रकर्षानं जाणवतात. ‘कॉफीशॉप’च्या वेळी सोशल मीडियाचं वा स्मार्टफोनचं प्रस्थ फार नव्हतं. याउलट ‘टी-टाइम’ लिहीत असतानाच्या काळात सोशल मीडिया आणि वास्तव जग यातलं अंतर बऱ्यापैकी कमी झालं होतं. आभासी जगाचा प्रभाव वाढत होता. व्यक्ती आणि समष्टीतलं नातं बदलत होतं. जीर्ण नाती संपत होती, नाव नसलेली अनेक नाती जन्माला येत होती. अभिव्यक्तीची माध्यमं जेवढी वैयक्तिक झाली, तेवढे अभिव्यक्तीचे प्रकार बदलले. संवादातून मिळणारा आनंद वाढला, त्याच वेळी अपेक्षाभंगही वाढले.
याशिवाय आपल्या आजूबाजूचं वास्तवातलं जगही बदलत चाललं होतंच. समाज म्हणून आपल्यातली अंतरं वाढण्याचा हाच काळ होता. जातीय अस्मितांचे खोटे निखारे स्वार्थी राजकारण्यांच्या फुंकणीनं फुलवले. त्या कोळशाचे काळे सावट सगळ्या समाजावर पडले. खेडी आणि शहरं यातलं मानसिक अंतर वाढत गेलं. पारंपरिक कुटुंबव्यवस्थेपासूनचं आपलं अंतर वाढत गेलं. गरीब आणि श्रीमंत यांच्यातलं अंतर वाढत गेलं. आपली कर्तव्यं आणि हक्क यांचं एकमेकांपासूनचं अंतर वाढत गेलं. एकीकडं शेतकरी आत्महत्या करीत होते, तर दुसरीकडं बडे उद्योगपती हजारो कोटींची कर्जं बुडवून परदेशांत राजरोस मिरवीत होते. गुणवत्तेपेक्षा शोबाजीला महत्त्व आलं होतं. याच लेखनाच्या काळात केंद्र आणि राज्यांतील सरकारं बदलली. आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. आपलं चिमुकलं मध्यमवर्गीय सांस्कृतिक भावविश्वही बदलत गेलं. सण-समारंभ साजरे करण्याच्या पारंपरिक रीतींचा अनेकांना कंटाळा आला. अनेकांनी नवं काही करण्यासाठी पावलं उचलली. आत्मविश्वासाच्या जोरावर यशही मिळवून दाखवलं. पैशांची सुबत्ता गेल्या दोन दशकांपासून येत होतीच; त्या पैशांमुळं अनेकांना जग पाहायला मिळालं आणि त्यातून एक वेगळा, आधुनिक, उदार दृष्टिकोन बहुतेकांना लाभला. समाज म्हणून आपल्याकडं घडलेला हा एक चांगला बदल होता. कुटुंबसंस्थेचा ऱ्हास आणि त्याअनुषंगाने पारंपरिक नात्यांचाही होत चाललेला लोप हा अनेकांना दुखावणारा बदलही याच काळात घडत होता.
या सगळ्याकडं निखळ नजरेनं पाहत, हसत-खेळत हे बदल टिपून त्यावर कधी तिरकस, तर कधी बोचरी टिप्पणी करून लिहिलेलं हे सदर आहे. अशा सदरांचं पुस्तक करावं की न करावं, यावर मी ‘कॉफीशॉप’च्या मनोगतातही भाष्य केलं होतं आणि इथंही परत सांगतो, की हे संकलन म्हणजे केवळ त्या सदरातील लेखांचं निव्वळ एकत्रीकरण नव्हे. हा त्या काळाशी संबंधित एक महत्त्वाचा सामाजिक दस्तावेज असतो आणि त्या दृष्टीनं याकडं पाहिलं तर एक वेगळा आयाम या लेखनाला मिळू शकतो. समाजात हळूहळू, सूक्ष्मरूपाने होत असलेले बदल अशा सदरांतून, अशा लिखाणातून नकळत प्रतिबिंबित होत असतात. असे सामाजिक बदल टिपणं हा माझा स्वतःचा अभ्यासाचा विषय आहे. सामाजिक बदलांचा अभ्यास करणाऱ्या कोणालाही या लेखांतून हा बदलांचा दस्तावेज मिळू शकेल, अशी आशा वाटते.
हे सदर लिहिण्यासाठी मला परवानगी देणारे आणि मी स्वतःहून ते थांबवेपर्यंत चालू देणारे माझे संपादक पराग करंदीकर यांचे मनःपूर्वक आभार मानतो. या लेखांचे पुस्तक करण्यासाठी परवानगी देणारे संपादक अशोक पानवलकर यांचेही मी मनापासून आभार मानतो.‘मटा’चे वृत्तसंपादक श्रीधर लोणी आणि ‘मटा’मधील अन्य सहकाऱ्यांचेही मला नेहमीच प्रोत्साहन मिळते. त्या सर्वांचे मला यानिमित्ताने मनापासून आभार मानावेसे वाटतात. ‘कॉन्टिनेंटल’च्या संचालिका देवयानी अभ्यंकर यांनी अतिशय वेळेत हे पुस्तक पूर्ण केले आणि अतिशय आकर्षक रूपात ते आपल्यासमोर सादर केले, याबद्दल त्यांनाही मनःपूर्वक धन्यवाद. या पुस्तकाचे देखणे मुखपृष्ठ तयार करणारे सागर नेने आणि मुद्रितशोधन करणारे विजय जोशी यांचेही आभार. याशिवाय माझ्यावर मनापासून प्रेम करणारे माझे अगणित मित्र-मैत्रिणी, माझं प्रत्येक पुस्तक विकत घेऊन वाचणारे माझे वाचक आणि मला कायम प्रोत्साहन देणारे माझे सर्व गुरुजन यांच्या मी कायम ऋणातच राहू इच्छितो.
सर्वांत शेवटी आणि सर्वांत महत्त्वाचे आभार मानायचे ते माझ्या कुटुंबाचे. माझं कायम कौतुक करणारे माझे आई-वडील, माझ्यामागे भक्कमपणे उभी असलेली माझी पत्नी धनश्री आणि आता हळूहळू माझ्या प्रत्येक कामाची प्रेरणा बनत चाललेला माझा मुलगा नील या सर्वांमुळेच मी जो काही आहे तो आहे.
चहा हे आपल्या सगळ्यांच्या आवडीचं पेय आहे. चहा घेतल्यानंतर आपल्याला तरतरी येते आणि अंगी उत्साह येतो. हे पुस्तक वाचून आपल्या मनातही तीच भावना आली, तर हे अल्पस्वल्प बुद्धीने केलेले लिखाण सार्थकी लागेल.

Contact Details

संपर्क

वृत्तसंपादक,
महाराष्ट्र टाइम्स‚ पुणे आवृत्ती
टाइम्स हाउस‚ ५७७‚ शिवाजीनगर‚
नामदार गोपाळ कृष्ण गोखले रोड ⟨फर्ग्यसन रोड)‚ पुणे- ४


मोबाईल नंबर : 9881098050
ई-मेल :shree.brahme@gmail.com

संपर्कासाठी कृपया खालील फॉर्म भरा.