मी मूळचा जामखेडचा. नगर जिल्ह्यातील या तालुक्याच्या ठिकाणाहून सुरू झालेला माझा प्रवास नगरमार्गे पुण्यात येऊन पोचला त्यालाही आता वीस वर्षे होऊन गेली. ....
लहानपणी जामखेडच्या लोकमान्य वाचनालयाचा संस्कार झाल्यामुळं वाचनाची गोडी लागली. त्यातूनच लहानपणापासूनच शब्दांचा लळा लागला.
गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा बोलबाला आहे. ब्लॉगसारखं माध्यम आता सर्वांनाच उपलब्ध आहे. कार्यालयीन गरजेव्यतिरिक्त आपण स्वतःसाठीही अनेकदा लिहीत असतो.
कॉफीशॉप हे माझं पहिलं पुस्तक. मी 'सकाळ'मध्ये काम करीत असताना दर रविवारी याच नावाचं सदर लिहायचो. ते २००७ ते २०१० या काळात प्रसिद्ध झालं. तेव्हा मी एकूण १७६ भाग लिहिले.
मी २००३ मध्ये सिनेमांची परीक्षणं लिहायला लागलो. तेव्हापासून ते २०१४ पर्यंत मी हे काम करीत होतो. आधी 'सकाळ' आणि नंतर 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये मिळून मी सुमारे ३०७ सिनेमांची परीक्षणं लिहिली.
सिनेमांच्या परीक्षणाव्यतिरिक्त सिनेमा या विषयावरही विपुल लिखाण करून झालं. ते 'सकाळ' व 'मटा'सह काही दिवाळी अंकांत लिहिलं होतं आणि माझ्या ब्लॉगवर वेगवेगळ्या लेखांच्या स्वरूपात उपलब्ध होतं.
मनोविकास प्रकाशन या पुण्यातील आघाडीच्या प्रकाशन संस्थेतर्फे सुपर हिरोज ही कुमारवयीन मुलांसाठी पुस्तकांची मालिका प्रकाशित केली जाते. या मालिकेत मला एम. एस. धोनीवर लिहायला मिळाले. एम. एस. धोनी हा माझाही आवडता खेळाडू आहे. माझ्या मुलाच्या आग्रहामुळेही मी हे पुस्तक लिहिले.
चहा म्हणजे चहा! चहा म्हणजे अहा!! चहा म्हणजे वाहवा!!! चहा म्हणजे तरतरी, चहा म्हणजे उत्साह, चहा म्हणजे खरंच भूलोकीचं अमृत... चहाची गंमत म्हणजे चहा घेताना कुणी तरी सोबतीला हवंच... चहाची लज्जत आणखीनच वाढते... आपला अगदी छोट्यातला छोटा आनंदही 'दो कटिंग' मारून साजरा करीत असतो आपण... चहा घ्यायला कुठलीही ठरावीक वेळ नाही, काळ नाही, ऋतू नाही, मास नाही... चहा कधीही घ्यावा, कितीही घ्यावा... असा हा चहा घेताना आपण सगळे उत्साहानं किती काय काय बोलत असतो... सुखाचे, आनंदाचे, नैराश्याचे, वैतागाचे, समाधानाचे, हसण्याचे, रडण्याचे, प्रेमाचे, दुःखाचे असे कित्येक क्षण आपण साजरे करतो ते घोटभर चहासोबत... 'टी-टाइम' हे पुस्तक म्हणजे दुसरं काही नाही... चहा घेताना आपल्या प्रियजनांसोबत मारलेल्या या दिलखुलास गप्पा आहेत... राजकारणापासून खेळापर्यंत, सणापासून ते ऋतूंपर्यंत, घरापासून समाजापर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत... अशा सगळ्या विषयांवरच्या, २०११ ते २०१४ या काळातल्या या मनसोक्त गप्पा...
‘थ्री चीअर्स’ हे माझं एकुणात सहावं आणि कॉन्टिनेंटल प्रकाशनाकडून प्रकाशित होत असलेलं तिसरं पुस्तक. ‘महाराष्ट्र टाइम्स’ व अन्य काही नियतकालिकांत गेल्या तीन वर्षांत मी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. या सर्व लेखांमध्ये विनोद हा समान धागा आहे. हे असे विनोदी स्वभाव असलेले लेख लिहिण्याची प्रेरणा ज्यांच्यापासून मला मिळाली, त्या ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीत हे पुस्तक प्रकाशित होत आहे, याचा मला मनापासून आनंद आहे.
वृत्तसंपादक,
महाराष्ट्र टाइम्स‚ पुणे आवृत्ती
टाइम्स हाउस‚ ५७७‚ शिवाजीनगर‚
नामदार गोपाळ कृष्ण गोखले रोड 〈फर्ग्यसन रोड)‚ पुणे- ४