कॉफीशॉप हे माझं पहिलं पुस्तक. मी 'सकाळ'मध्ये काम करीत असताना दर रविवारी याच नावाचं सदर लिहायचो. ते २००७ ते २०१० या काळात प्रसिद्ध झालं. तेव्हा मी एकूण १७६ भाग लिहिले. त्यातील निवडक ६० भागांचं हे पुस्तक कॉन्टिनेंटल प्रकाशनातर्फे २०१५ मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या हस्ते आणि प्रसिद्ध भाष्यकवी रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पत्रकार संघातील सभागृहात प्रसिद्ध झालं. याच कार्यक्रमात या पुस्तकाचं ई-बुकही 'बुकगंगा'तर्फे प्रसिद्ध झालं. या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला... त्यासाठी देवयानी अभ्यंकर आणि मंदार जोगळेकर यांचे प्रयत्न व प्रोत्साहन महत्त्वाचं ठरलं... हलक्याफुलक्या शैलीतलं हे 'सेलिब्रेशन रायटिंग' आपल्याला नक्की आवडेल... शिवाय हे माझं पहिलंच पुस्तक असल्यानं ते माझ्यासाठी जरा खास आहे...!
कॉफीशॉप
खरेदी करा
परीक्षण
मी २००३ मध्ये सिनेमांची परीक्षणं लिहायला लागलो. तेव्हापासून ते २०१४ पर्यंत मी हे काम करीत होतो. आधी 'सकाळ' आणि नंतर 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये मिळून मी सुमारे ३०७ सिनेमांची परीक्षणं लिहिली. यातल्या निवडक परीक्षणांचं पुस्तक करावं, असं मराठी चित्रपट महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष अजय सरपोतदार यांनी एका कार्यक्रमात मला सुचवलं होतं. माझे मित्र, चपराक प्रकाशनाचे घनश्याम पाटील यांनी पुढाकार घेऊन हे पुस्तक केलं. ते २०१६ मध्ये माझे सहकारी व समीक्षक मित्र मंदार कुलकर्णी, महेश बर्दापूरकर, अभिजित पेंढारकर, अभिजित थिटे व जयदीप पाठकजी यांच्या हस्ते पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेत प्रकाशित झालं. या पुस्तकात २५ मराठी व २५ हिंदी अशा निवडक ५० परीक्षणांचा समावेश आहे... सिनेमाप्रेमींनी हा दस्तावेज पाहायला विसरू नये...
फर्स्ट डे फर्स्ट शो
खरेदी करा
परीक्षण
सिनेमांच्या परीक्षणाव्यतिरिक्त सिनेमा या विषयावरही विपुल लिखाण करून झालं. ते 'सकाळ' व 'मटा'सह काही दिवाळी अंकांत लिहिलं होतं आणि माझ्या ब्लॉगवर वेगवेगळ्या लेखांच्या स्वरूपात उपलब्ध होतं. याचं पुस्तक करायची कल्पना माझी मैत्रीण मनस्विनी प्रभुणे-नायक हिची. तिच्या समदा प्रकाशनातर्फे तिनं हे पुस्तक केलं आणि ते माझी आवडती अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिच्या हस्ते पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात प्रकाशित झालं. या पुस्तकाचं अतिशय उत्तम डिझाइन माझा मित्र जयदीप कडू यानं केलं आहे आणि मुखपृष्ठ ल. म. कडू यांनी... सिनेमावरचे काही गंभीर चर्चा करणारे लेख आणि अमिताभ, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, निळू फुले या अभिनेत्यांवरचे विशेष लेख यात वाचायला मिळतील.
यक्षनगरी
खरेदी करा
परीक्षण
मनोविकास प्रकाशन या पुण्यातील आघाडीच्या प्रकाशन संस्थेतर्फे सुपर हिरोज ही कुमारवयीन मुलांसाठी पुस्तकांची मालिका प्रकाशित केली जाते. या मालिकेत मला एम. एस. धोनीवर लिहायला मिळाले. एम. एस. धोनी हा माझाही आवडता खेळाडू आहे. माझ्या मुलाच्या आग्रहामुळेही मी हे पुस्तक लिहिले. मनोविकास प्रकाशनाचे अरविंदकाका आणि आशिष पाटकर यांच्या आणि संपादिका स्नेहा अवसरीकर यांच्या सहकार्यामुळंच हे पुस्तक झालं... याचा औपचारिक प्रकाशन समारंभ झाला नाही. मात्र, 'मनोविकास'च्या यंत्रणेतून हे पुस्तक सर्वदूर पोचलंय. लहान मुलांना हे पुस्तक आवडतंय, असा प्रतिसाद आहे... पण मुलांसोबत मोठ्यांनीही आवर्जून वाचावं असं मला वाटतं...
खरेदी करा
टी-टाइम हे माझं ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील सदर. ‘मटा’च्या पुणे आवृत्तीत मी ते २०११ ते २०१४ अशी चार वर्षं सलग चालवलं. दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या या सदराचे चार वर्षांत मिळून बरोबर दोनशे भाग झाले. या सदरानं मला मनोमन आनंद दिला. असं सदर लिहिण्याचा मला आधीचा अनुभव होता. मी ‘सकाळ’मध्ये असताना याच पद्धतीनं ‘कॉफीशॉप’ हे सदर चालवलं होतं. त्या सदरातील निवडक भागांचं संकलन असलेलं पुस्तक‘कॉफीशॉप’ याच शीर्षकाचं कॉन्टिनेंटल प्रकाशनानंच दोन वर्षांपूर्वी प्रकाशित केलं. त्या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मधल्या काळात माझी अन्य तीन पुस्तकं अन्य प्रकाशनांतर्फे प्रकाशित झाली. आता‘मटा’मधील सदरातील निवडक भागांचं पुस्तक पुन्हा‘कॉन्टिनेंटल’तर्फे प्रकाशित होत असल्याचा मला मनापासून आनंद आहे.
टी-टाईम
खरेदी करा
परीक्षण
‘थ्री चीअर्स’ हे माझं एकुणात सहावं आणि कॉन्टिनेंटल प्रकाशनाकडून प्रकाशित होत असलेलं तिसरं पुस्तक. ‘महाराष्ट्र टाइम्स’ व अन्य काही नियतकालिकांत गेल्या तीन वर्षांत मी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. या सर्व लेखांमध्ये विनोद हा समान धागा आहे. हे असे विनोदी स्वभाव असलेले लेख लिहिण्याची प्रेरणा ज्यांच्यापासून मला मिळाली, त्या ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीत हे पुस्तक प्रकाशित होत आहे, याचा मला मनापासून आनंद आहे.
थ्री चीअर्स
खरेदी करा
परीक्षण
‘टी-टाइम’मधील लेखन वाचून अनेकांना ‘कॉफीशॉप’ची आठवण येईल. दोन्ही सदरांची जातकुळी अगदी एकच असली, तरी मला स्वतःला ‘टी-टाइम’मधील लेख वेगळे वाटतात. माणूस म्हणून, लेखक म्हणून माझ्यात झालेली वाढ या नव्या सदरात जाणवेल. शिवाय हल्ली दर पाच वर्षांनी पिढी बदलते, असं म्हणतात. त्याही अर्थानं‘कॉफीशॉप’च्या वेळी असलेलं जग आणि ‘टी-टाइम’लिहितानाच्या वेळचं जग यात निश्चितच बदल झालेला दिसेल. विशेषतः तंत्रज्ञानातील बदल फारच प्रकर्षानं जाणवतात. ‘कॉफीशॉप’च्या वेळी सोशल मीडियाचं वा स्मार्टफोनचं प्रस्थ फार नव्हतं. याउलट ‘टी-टाइम’ लिहीत असतानाच्या काळात सोशल मीडिया आणि वास्तव जग यातलं अंतर बऱ्यापैकी कमी झालं होतं. आभासी जगाचा प्रभाव वाढत होता. व्यक्ती आणि समष्टीतलं नातं बदलत होतं. जीर्ण नाती संपत होती, नाव नसलेली अनेक नाती जन्माला येत होती. अभिव्यक्तीची माध्यमं जेवढी वैयक्तिक झाली, तेवढे अभिव्यक्तीचे प्रकार बदलले. संवादातून मिळणारा आनंद वाढला, त्याच वेळी अपेक्षाभंगही वाढले.
याशिवाय आपल्या आजूबाजूचं वास्तवातलं जगही बदलत चाललं होतंच. समाज म्हणून आपल्यातली अंतरं वाढण्याचा हाच काळ होता. जातीय अस्मितांचे खोटे निखारे स्वार्थी राजकारण्यांच्या फुंकणीनं फुलवले. त्या कोळशाचे काळे सावट सगळ्या समाजावर पडले. खेडी आणि शहरं यातलं मानसिक अंतर वाढत गेलं. पारंपरिक कुटुंबव्यवस्थेपासूनचं आपलं अंतर वाढत गेलं. गरीब आणि श्रीमंत यांच्यातलं अंतर वाढत गेलं. आपली कर्तव्यं आणि हक्क यांचं एकमेकांपासूनचं अंतर वाढत गेलं. एकीकडं शेतकरी आत्महत्या करीत होते, तर दुसरीकडं बडे उद्योगपती हजारो कोटींची कर्जं बुडवून परदेशांत राजरोस मिरवीत होते. गुणवत्तेपेक्षा शोबाजीला महत्त्व आलं होतं. याच लेखनाच्या काळात केंद्र आणि राज्यांतील सरकारं बदलली. आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. आपलं चिमुकलं मध्यमवर्गीय सांस्कृतिक भावविश्वही बदलत गेलं. सण-समारंभ साजरे करण्याच्या पारंपरिक रीतींचा अनेकांना कंटाळा आला. अनेकांनी नवं काही करण्यासाठी पावलं उचलली. आत्मविश्वासाच्या जोरावर यशही मिळवून दाखवलं. पैशांची सुबत्ता गेल्या दोन दशकांपासून येत होतीच; त्या पैशांमुळं अनेकांना जग पाहायला मिळालं आणि त्यातून एक वेगळा, आधुनिक, उदार दृष्टिकोन बहुतेकांना लाभला. समाज म्हणून आपल्याकडं घडलेला हा एक चांगला बदल होता. कुटुंबसंस्थेचा ऱ्हास आणि त्याअनुषंगाने पारंपरिक नात्यांचाही होत चाललेला लोप हा अनेकांना दुखावणारा बदलही याच काळात घडत होता.
या सगळ्याकडं निखळ नजरेनं पाहत, हसत-खेळत हे बदल टिपून त्यावर कधी तिरकस, तर कधी बोचरी टिप्पणी करून लिहिलेलं हे सदर आहे. अशा सदरांचं पुस्तक करावं की न करावं, यावर मी ‘कॉफीशॉप’च्या मनोगतातही भाष्य केलं होतं आणि इथंही परत सांगतो, की हे संकलन म्हणजे केवळ त्या सदरातील लेखांचं निव्वळ एकत्रीकरण नव्हे. हा त्या काळाशी संबंधित एक महत्त्वाचा सामाजिक दस्तावेज असतो आणि त्या दृष्टीनं याकडं पाहिलं तर एक वेगळा आयाम या लेखनाला मिळू शकतो. समाजात हळूहळू, सूक्ष्मरूपाने होत असलेले बदल अशा सदरांतून, अशा लिखाणातून नकळत प्रतिबिंबित होत असतात. असे सामाजिक बदल टिपणं हा माझा स्वतःचा अभ्यासाचा विषय आहे. सामाजिक बदलांचा अभ्यास करणाऱ्या कोणालाही या लेखांतून हा बदलांचा दस्तावेज मिळू शकेल, अशी आशा वाटते.
हे सदर लिहिण्यासाठी मला परवानगी देणारे आणि मी स्वतःहून ते थांबवेपर्यंत चालू देणारे माझे संपादक पराग करंदीकर यांचे मनःपूर्वक आभार मानतो. या लेखांचे पुस्तक करण्यासाठी परवानगी देणारे संपादक अशोक पानवलकर यांचेही मी मनापासून आभार मानतो.‘मटा’चे वृत्तसंपादक श्रीधर लोणी आणि ‘मटा’मधील अन्य सहकाऱ्यांचेही मला नेहमीच प्रोत्साहन मिळते. त्या सर्वांचे मला यानिमित्ताने मनापासून आभार मानावेसे वाटतात. ‘कॉन्टिनेंटल’च्या संचालिका देवयानी अभ्यंकर यांनी अतिशय वेळेत हे पुस्तक पूर्ण केले आणि अतिशय आकर्षक रूपात ते आपल्यासमोर सादर केले, याबद्दल त्यांनाही मनःपूर्वक धन्यवाद. या पुस्तकाचे देखणे मुखपृष्ठ तयार करणारे सागर नेने आणि मुद्रितशोधन करणारे विजय जोशी यांचेही आभार. याशिवाय माझ्यावर मनापासून प्रेम करणारे माझे अगणित मित्र-मैत्रिणी, माझं प्रत्येक पुस्तक विकत घेऊन वाचणारे माझे वाचक आणि मला कायम प्रोत्साहन देणारे माझे सर्व गुरुजन यांच्या मी कायम ऋणातच राहू इच्छितो.
सर्वांत शेवटी आणि सर्वांत महत्त्वाचे आभार मानायचे ते माझ्या कुटुंबाचे. माझं कायम कौतुक करणारे माझे आई-वडील, माझ्यामागे भक्कमपणे उभी असलेली माझी पत्नी धनश्री आणि आता हळूहळू माझ्या प्रत्येक कामाची प्रेरणा बनत चाललेला माझा मुलगा नील या सर्वांमुळेच मी जो काही आहे तो आहे.
चहा हे आपल्या सगळ्यांच्या आवडीचं पेय आहे. चहा घेतल्यानंतर आपल्याला तरतरी येते आणि अंगी उत्साह येतो. हे पुस्तक वाचून आपल्या मनातही तीच भावना आली, तर हे अल्पस्वल्प बुद्धीने केलेले लिखाण सार्थकी लागेल.
- श्रीपाद ब्रह्मे
वृत्तसंपादक,
महाराष्ट्र टाइम्स‚ पुणे आवृत्ती
टाइम्स हाउस‚ ५७७‚ शिवाजीनगर‚
नामदार गोपाळ कृष्ण गोखले रोड 〈फर्ग्यसन रोड)‚ पुणे- ४