सकाळी उठल्यानंतर पहिला चहा घेत वृत्तपत्राचे वाचन करणे ही सर्वांनाच आवडणारी गोष्ट. मन सुन्न करणाऱ्या अनेक घटना आसपास घडत असतात. त्याच्या बातम्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत असतात. अशा वेळी उद्विग्न झालेल्या मनाला प्रसन्नता देणारे लेखन वाचकांना विशेष भावते. अशा प्रकारच्या लेखनाचे सदर ही केवळ वृत्तपत्रांची गरज असते असे नाही; ती वाचकांचीही गरज असते. प्राप्त परिस्थिती बदलता येणार नाही, मग अशा परिस्थितीत खेळकरपणाने मनाची समजूत घालणारे, विसंगतीवर बोट ठेवणारे, नर्म विनोदाची पखरण करणारे आणि हसायला लावणारे एखादे सदर वृत्तपत्रात असेल तर वाचकांकडून ते आवर्जून वाचले जाते. दै. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या पुणे आवृत्तीत उपवृत्तसंपादक या पदावर काम करणारे पत्रकार -लेखक श्रीपाद ब्रह्मे यांनी 'टी-टाइम' या सदरात सलग चार वर्षे लिहिलेल्या लेखांतील निवडक लेखांचे संकलन 'टी-टाइम' या पुस्तकात आहे. खुमासदार शैलीतले मन प्रसन्न करणारे लेख या पुस्तकात आहेत.
'फेस्टिव्ह स्पेशल', 'सोशल कटिंग', 'तरतरीत ऋतू', 'मसाला दिन', 'राजकीय मारामारी', 'वाफाळते साहित्य', 'कडक सुट्टी' आणि 'अमृततुल्य' अशा आठ विभागांत ब्रह्मेंनी वाचकांच्या सोयीसाठी केलेले लेखांचे वर्गीकरण सलग वाचनाचा आनंद वाचकांना देते आणि ब्रह्मेंच्या चौफेर मुशाफिरीचेही दर्शन घडविते.
भारतीय समाज हा उत्सवप्रिय आहे. सण-उत्सव हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. काळ बदलतो आहे तसे या सण-उत्सवांचे रूपही बदलत आहे. त्यातला पारंपरिक साधेपणा अभावानेच प्रत्ययाला येतो. सर्वत्र दिखाऊपणाचा कडेलोट होताना दिसतो. पण माणसांचा उत्साह काही कमी होताना दिसत नाही. या सगळ्या बदलांकडे श्रीपाद ब्रह्मेंमधला खेळकर लेखक आणि विनोदकार तिरक्या नजरेने पाहतो आणि दंभावर बोट ठेवत, त्यातली विसंगती आपल्या लक्षात आणून देतो. संक्रांतीपासून गणेशोत्सवापर्यंत आणि दहीहंडीपासून नाताळपर्यंत येणाऱ्या सर्व सण-उत्सवांच्या निमित्ताने ब्रह्मे यांनी लेखांतून केलेले भाष्य हास्याची लकेर उमटवत अंतर्मुख करणारेही आहे.
'सोेशल कटिंग' या भागातील 'एप्रिल फूल', 'कांदा - द बॉस', 'साभार परत', 'काम-लीला', 'फॅमिली फिक्सर', 'तिला सोडताना' हे लेख त्या त्या वेळेस घडलेल्या घटनांवर नेमकेपणाने टिप्पणी करतात. 'काम'-लीला या लेखात ते म्हणतात, 'आपल्या देशातल्या एक से एक नरपुंगवांनी चालविलेल्या (की चाळविलेल्या?) लीला पाहून या देशात राम-लीला संपून 'काम'-लीला उरली आहे की काय, अशी शंका येऊ लागली आहे.' या लेखाचा समारोप करताना ते लिहितात, 'ही बनावट नाणेफेक थांबवायची असेल, तर काम-लीलेचे प्रयोग आधी बंद केले पाहिजेत. 'काम चालू, रस्ता बंद' याप्रमाणे नवी स्लोगन असावी - निर्भय जगणं चालू, 'काम'-लीला बंद!' शब्दचमत्कृती आणि विरामचिन्हांचा प्रभावी वापर यामुळे ब्रह्मेंचे लेखन शब्दांपलीकडचे खूप काही सांगून जाते. त्यांच्या लेखनात 'कोट्या' करण्याचा मोह त्यांना आवरता येत नाही हे दिसत असले, तरी त्या कोट्या त्यांना जमल्या आहेत हे मान्यच करावे लागते.
येणारा प्रत्येक ऋतू माणसाला आनंद देत असतोच. त्याचबरोबर त्याच्या मनोवृत्तीतही बदल घडवत असतो. त्याविषयी 'तरतरीत ऋतू' या सदरात ब्रह्मेंनी लिहिलेले लेख वाचकांनाही 'तरतरी' देणारे आहेत. वाचकांना समृद्ध करणाऱ्या संदर्भांची रेलचेल ब्रह्मेंच्या या छोटेखानी लेखनात आहे. ब्रह्मेंनी आपल्या खास शैलीत घडविलेली 'ऋतुसफर' वाचकांच्याच मनातल्या भावना व्यक्त करणारी आहे.
सध्याचे युग साजरे करण्याचे आहे. दुःख असो वा आनंद, तो साजरा करायचाच अशी समाजाची मानसिकता झाली. त्यात निमित्त मिळाले, की उत्साहाला उधाण येते. त्यामुळे माणसे अशा निमित्ताच्याच शोधात असतात. त्यातूनच अमुक 'डे' - तमुक 'डे' यांचे प्रस्थ वाढले. त्याबाबत 'मसाला दिन' या भागातील ब्रह्मेंचे लेख आवर्जून वाचावेत, असेच आहेत. विनोदबुद्धी क्षीण होणे आणि हास्य लोपणे हे समाजाच्या सांस्कृतिक अधोगतीचे लक्षण मानले जाते. आजच्या समाजाची त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे. जीवनातले नैसर्गिक हास्य लुप्त झाल्यामुळे 'हास्य'दिनाचे प्रस्थ वाढले. यानिमित्त पुलंनी कसे भाषण केले असते, या संदर्भात ब्रह्मेंनी लिहिलेला लेख अप्रतिम आहे. या लेखाच्या समारोपात ब्रह्मे लिहितात - 'बाकी हल्ली हसण्यासाठी दिवस वगैरे मुक्रर केलाय हे ठीकच झाले. पूर्वी 'दिवस' म्हटलं, की फक्त सुतकी चेहरे आणि डाळीचे वडे आठवायचे. हल्ली हास्यदिनाच्या निमित्ताने हसरे चेहरे आणि खमंग बटाटवडे दिसू लागले आहेत, हे खूप चांगलं झालं. त्या वड्यांचा वास आता माझ्या नाकालाही अस्वस्थ करतोय, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरच्या हसऱ्या रेषा वक्र होण्याच्या आत मी माझं पुराण आवरतं घेतो आणि थांबतो...' ब्रह्मेंनी लिहिलेले (पुलंची क्षमा मागून) हे भाषण पुलंचे म्हणून छापले तरी ते वाचकांना खरे वाटेल इतके सुरेख आणि खास पुलंच्या शैलीतले वाटते. 'व्हॅलेंटाइन डे'ची 'व्हेंटिलेटर डे' म्हणून उडवलेली खिल्ली आणि हा लेख छान जमला आहे.
राजकीय क्षेत्र, त्यातल्या घडामोडी आणि तिथली कलंदर माणसं ब्रह्मेंच्या तावडीतून सुटलेली नाहीत. 'छोटे वडे अन् चिकन सूप' या लेखातल्या राज मिसळ, काका काकवी, डॅम सूप, मालवणी खाजा, बुंदीटेक किंवा गडबुंदी या इलेक्शन स्पेशल रेसिपी वाचण्यासारख्या आहेत. 'राज मिसळ' दादरमध्ये प्रसिद्ध आहे. 'काका' काकवी करताना आपलीच रोजची बदलणारी विधानं त्यात वेलची म्हणून घालत राहायचं, दादांचं आवडतं 'डॅम सूप' बनवताना मालदार खात्याचा खलबत्ता घ्यायचा, त्यात निविदांचा मसाला कुटायचा, प्रसंगी कंत्राटदारांनाही कुटायचं, मग धरणातलं पाणी आणून फेस आणायचा अशा भन्नाट सूचक विधानांतून ब्रह्मे राजकीय नेत्यांचं अनोखं शब्दचित्र रेखाटतात.
'वाफाळते साहित्य' या भागातील लेखांतून ते सांस्कृतिक विश्वाची अनोखी सफर घडवितात. साहित्य संमेलन, नाट्य संमेलन, चित्रपट महोत्सव, विश्व संमेलन यातल्या राजकारणाचा, तिथल्या मंडळींच्या स्वार्थाचा, सुंदोपसुंदीचा ते समाचार घेतात. या पुस्तकातील 'कडक सुट्टी' आणि 'अमृततुल्य' या भागांतील लेखही वाचनीय आहेत.
वृत्तपत्रातील सदर लेखनाला तत्कालिकतेचा शाप लाभलेला आहे, असे म्हटले जाते. याला अपवाद असणारे लेखनही असते. ब्रह्मेंचे लेखन याच प्रकारातले आहे. त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती, तरल विनोदबुद्धी आणि लेखनाची कमावलेली खास खुमासदार शैली यामुळे त्यांचे लेखन वाचकांना गुंतवून ठेवते. लेखनातील सातत्य, वैविध्य आणि गुणवत्ता यांच्या जोडीला असलेला लेखनातला ताजेपणा यामुळे 'टी-टाइम' हे पुस्तक निश्चितच वाचकप्रिय ठरेल. या पुस्तकाला ज्येष्ठ विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे यांची प्रस्तावना लाभली आहे. चहाचे घोट घेत घेत वाचावे आणि वाचनानंद मिळवावा, असे हे पुस्तक आहे.
वृत्तसंपादक,
महाराष्ट्र टाइम्स‚ पुणे आवृत्ती
टाइम्स हाउस‚ ५७७‚ शिवाजीनगर‚
नामदार गोपाळ कृष्ण गोखले रोड 〈फर्ग्यसन रोड)‚ पुणे- ४