श्रीपाद ब्रह्मे यांचे ‘थ्री चीअर्स’ हे कॉन्टिनेंटल प्रकाशनाने केलेले पुस्तक हातात आले आणि वाचता वाचता वाळवंटात ‘ओऍसिस ’ दिसल्याचा भास झाला. सध्या वाचन, वाचन संस्कृतीविषयी तापलेल्या चर्चा वाचत-ऐकत असताना अचानक एक सुरेखसा हिरवळीचा कोपरा दिसला. त्या हिरव्याशार जमिनीच्या तुकड्यावर, त्या बेटावर बसून त्यांनी हसत हसत पुढे केलेला विनोदाचा आल्हाददायक पेला ‘थ्री चीअर्स’ म्हणून स्वीकारावा असेही वाटले. आजकाल आजूबाजूच्या तापलेल्या वास्तवामध्ये आपण ‘आपल्याला हसायलाही येते’ ही गोष्टच आपण विसरत चाललो आहोत की काय, असेही वाटून जाते. अशा वेळी हे पुस्तक वाचकांना सांगून जाते - ‘थ्री चीअर्स’ म्हणजे हसत जगणं, आनंदानं हसणं, समाधानी असणं, हवं ते सगळं साधणं...’ कधी कधी आपण हटवादी होतो आणि रोजच्या जगण्यातून हरवत चाललेल्या निखळ विनोदाला मुकतो; पण साध्यासुध्या आनंदातही ऊर्जेचा झरा लाभत असतो. हा आनंद कसा शोधावा, हे ‘थ्री चीअर्स’ वाचल्यावर नक्की कळून येईल. हे पुस्तक हाती घ्या, वाद-विवादांना अंमळ बाजूला सारा आणि त्यांना सांगा, ‘थांबा हो जरा! काही क्षण मस्त हसण्याची संधी प्राप्त होऊ द्यात मला. मग बघतो तुमच्याकडे! मग तुम्हीही मी हसत तुमच्यापुढे ठेवलेल्या पेल्याचा स्वीकार कराल आणि म्हणाल मला, थ्री चीअर्स!’
हो! विनोदी लेखनात इतकी ताकद आहेच, असते आणि असावी. श्रीपाद ब्रह्मे यांचे हे लेखन आपल्याला क्षणभर का होईना हा आनंद आपल्या हातात ठेवते. याचा अनुभव घ्याच तुम्ही. आणि तो घेण्यासाठी हे पुस्तकही हाती घ्या. मुळातच या पुस्तकाचे लेखक पत्रकार आहेत. त्यांना व्यसन आहे माणसं जोडण्याचं, माणसं वाचण्याचं! पुन्हा पत्रकार असल्याने सूक्ष्मशी निरीक्षणशक्ती त्यांच्या ठायी आहे. ही निरीक्षणशक्ती त्यांना समाजात, राजकीय वर्तुळात वावरताना उपयोगी पडतेच आहे. त्याचा उपयोग त्यांना या पुस्तकाच्या लेखनाला झालेला आहेच. पण आता त्यांची पावले अधिक कलात्मक, ‘स्व’तंत्र, आणि कल्पनाशक्तीचीा मदत घेत पुढे टाकली जात आहेत, ही अत्यंत अभिनंदनीय अशी गोष्ट आहे. या पुस्तकात त्यांची निर्मिती असलेला त्यांचा मानसपुत्र ‘गणू गणपुले’ भेटतो. मध्यमवर्गीय, सामान्य माणसाचे तो प्रतिनिधित्व करतो. हिवाळ्यात सहलींना जातो, सवाई गंधर्व महोत्सवाला जातो, पुण्याची खास ‘पेठ संस्कृती’ जगतो, हिवाळ्यातील पौष्टिक पदार्थ खाण्याचे योजतो, ‘दिवाळी पहाट’ला जाण्याचा आनंद घेतो, लहानपणी परीक्षांना घाबरणारा मोठेपणी मुलांना परीक्षांना न घाबरण्याचे धडे देतो. स्वत:ला फसवत जगण्यासाठीच्या सर्व गोष्टींना सामोरा जातो. लेखक त्याचे वर्णन फार छान करतात - ‘नाकासमोर चालणं आणि छापखान्यातल्या नोकरीसह घर-दार सांभाळणे, ही त्याची सर्वोच्च आकांक्षा! गणूनं मुळा-मुठेच्या काठी जन्मून, जन्मजात कमावलेला कुचकटपणा आणि वंशपरंपरेनं आलेली तैलबुद्धी याच दोन गोष्टी त्याच्या भाल्यातली प्रमुख अस्त्रं!’ असा हा गणू सर्वसामान्य वाचकांना आपलासा न वाटेल तरच नवल! पुस्तक वाचता वाचता आपण आपल्याला या गणूच्या ठिकाणी आपल्या नकळत ठेवायला लागतो. आणि ही भावना निर्माण करण्यात लेखक कमालीचा यशस्वी होतो, हेच या लेखनाचे यश! लेखक या यशासाठी आटापिटा करत नाही. रोजचेच अनुभव, त्यातले प्रसंग आपल्या सरळ-साध्या शब्दांत वाचकांच्या समोर ठेवतो. ही शैली अकृत्रिम असते आणि म्हणूनच ती आपल्याला भावते. आपण त्या अनुभवांशी तादात्म्य पावताना गालातल्या गालात हसू फुटावे, आपलेच चित्र आपण या गणूत बघत आहोत, असे वाटावे असा आपल्या जगण्याचा पुन:प्रत्ययाचा आनंद आपल्याला मिळतो. या लेखनात बोचरेपणा नाही, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कधी कधी आपल्या जगण्याची गोची, आपली रसिकता (?), आपल्या मनातली स्वप्नं, आपले हौसेचे सण-समारंभ, महोत्सव हे सगळं हा गणू गणपुले नामक ‘सात्त्विक पुणेकर’ आपल्यासमोर ठेवतो. ‘पुणेकर’ तोसुद्धा ‘सात्त्विक’ ही लेखकाने मारलेली कोपरखळी आपली कळी खुलवते आणि एका बैठकीत ‘गणू गणपुलेच्या गोष्टी’ वाचूनच पुस्तक बाजूला ठेवावेसे वाटते.
पुस्तकातला दुसरा भाग आहे ‘सोशल हास्या’वर आधारित. यातल्या ‘पोपट, मैना आणि कावळेकाकांची गोष्ट...’, ‘नस्ती कटकट’, ‘काही नवी योगासने’, ‘ओ काका...’, ‘संमेलन : एक घेणे’, ‘वृत्तपत्रीय विनोद’ आणि ‘ई-धोबीघाट’ या सर्व लेखांमधून हे ‘सोशल हास्य’ प्रकटते. हे सर्व लेखक स्वत: पत्रकार असल्याने त्याचे ‘होमपिच’च आहे, असे म्हणावेसे वाटते. ‘काही नवी योगासने’मध्ये लेखक कालोचित आणि समयोचित नवी आसने वाचकांना सुचवू बघतो. उदा. ‘अधोमुखासन’, ‘अंगुलीनर्तनासन’ ही मोबाइलच्या वापरासंबंधाने अस्तित्वात आलेली आहेत. ‘खुर्चीबूडघट्टचिकटासन’ हे लोकप्रिय आणि आजच्या काळात जास्त प्रचलित असे आसन! ‘चलनप्रियासन’ हे आसन आवडणाऱ्या लोकांना कागदी नोटा खाव्याशा वाटतात. ‘गलितगात्रासन’ हे आसन आजकाल ‘नावडते’, पण अनेकांवर लादले गेलेले आसन आहे. या सर्व आसनांचे खुमासदार वर्णन करून लेखक एक टिप्पणी जोडतो - ‘ही सर्व आसनं दूर करून प्रेमानं खरीखुरी योगासनं करायला मिळतील, तो दिवस माझ्या दृष्टीनं खराखुरा आंतरराष्ट्रीय योग दिवसअलेल. हा दिवस पाहण्याचा ‘योग’ कधी येतो, ते पाहू!’ एकंदरीत काय, पुस्तकाच्या या भागात एका पत्रकाराची ‘काकदृष्टी’ सर्व समाजावर सावधपणे फिरत समाजपिंडाला हलक्याशा टोची मारते आहे, हे जाणवून जातेच!
या पुस्तकात तिसरा भाग आहे ‘पोलिटिकल हास्या’वर आधारित. ‘तारीख पे तारीख’ देणारा मेट्रो प्रकल्प, नोटाबंदीचे आख्यान, केजरीवाल स्वत: ब्लॉग लिहीत आहेत असे कल्पून लिहिलेला ब्लॉग, विजय मल्ल्यावरचा ‘किंग ऑफ गुड होप’ हा लेख या सर्व लेखांतून लेखकाने त्या त्या राजकीय परिस्थितीवर, राजकीय हेतूने जाहीर होणाऱ्या योजनांवर आणि राजकीय नेत्यांवर भाष्य केले आहे. ‘मेट्रो आली रे अंगणी’ या लेखात लेखक म्हणतो, ‘पाच वर्षांनंतरचं चित्र आम्हाला लख्ख दिसतंय. एक जानेवारी २०२२... आम्ही शिवाजीनगर मेट्रो जंक्शनला उभे आहोत... महापालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे. (त्याचा लाइव्ह वृत्तान्त आमच्या मोबाइलवर आम्ही बघत आहोत!) पालिकेत आता नवीन प्रस्ताव आला आहे... आत्ता बांधलेले दोन्ही मेट्रोचे मार्ग काढून बीआरटी मेट्रो करायची... सध्या नदीकाठानं मेट्रो जाते, पण नदीच्या पृष्ठभागावरची बरीचशी जागा वाया जाते... तेव्ही तिथं मेट्रोची बीआरटी करा... दोन्ही बाजूंनी मेट्रो जातील, मध्ये पीएमपीचा बसचा ट्रॅक टाका... आणि खाली नदीत फास्ट क्रूझ सर्व्हिस द्या... क्रूझमधला माणूस ‘रोप वे’नं बसमध्ये बसेल... बसमधून उतरला, की त्याचं मेट्रोत पाऊल पडेल... तेवढ्यात दुसरे महाशय उठले आणि म्हणाले, ‘अहो, पण क्रूझ चालवण्याएवढं नदीत पाणी नाही, त्याचं काय करायचं?’ त्यावर पहिले महाशय म्हणाले, ‘माझी मिनरल वॉटरची फॅक्टरी आहे. टेंडर काढा... पाहिजे तेवढं मिनरल वॉटर नदीत ओतू...’ आणि अचानक पालिका सभेत पूर आला... सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं...’ या टिप्पणीवरून लेखकानं साधलेलं सर्व राजकीय परिस्थितीवरचं ‘शरसंधान’ किती अचूक आहे, याची कल्पना येईलच! सुज्ञांस सांगणे न लगे! तर असे हे ‘थ्री चीअर्स’.... वरवर विनोदी, पण त्याला वास्तवावर हलक्याशा केलेल्या कोपरखळ्यांचे अस्तर. दिवाळीतल्या लवंगी फटाक्याच्या लडीसारखे! कोणालाही चटका बसू द्यायचा नाही, पण फटाके फोडण्यातला आनंद तर निर्विवादपणे मिळू देणारी लवंगी फटाक्यांची लड!
याआधी ब्रह्मे यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘कॉफीशॉप’, ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’, ‘यक्षनगरी’, ‘एम. एस. धोनी : जिद्दीचा षटकार’, ‘टी-टाइम’ ही सर्वच पुस्तके चांगली आहेत. पण शेवटी ‘थ्री चीअर्स’ म्हणण्यातली मौज काही औरच! आणि काळाशी सुसंगत! ही जगण्यातली मौज कॉन्टिनेंटल प्रकाशनाने आपल्या हाती दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार. या पुस्तकाला लाभलेली समर्थ लेखिका मंगला गोडबोले यांची प्रस्तावनाही महत्त्वाची आहे. आणि एक विनोदी पुस्तक वाचण्यासाठी, दुसऱ्याने गुदगुल्या करून हसविण्याचे काहीच कारण नाही. ते आपले आपल्याला वाचून आपले आपल्यालाच हसायला येते. आपले आपणच हसू शकतो, असे ‘इनोदी लेखन’ केल्याबद्दल ‘लेखकाय नमो नम:’ आणि ‘थ्री चीअर्स’!
(महाराष्ट्र टाइम्सच्या संवाद पुरवणीत २० जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या संपादित परीक्षणाचा मूळ तर्जुमा)
वृत्तसंपादक,
महाराष्ट्र टाइम्स‚ पुणे आवृत्ती
टाइम्स हाउस‚ ५७७‚ शिवाजीनगर‚
नामदार गोपाळ कृष्ण गोखले रोड 〈फर्ग्यसन रोड)‚ पुणे- ४