चित्रपटसृष्टी, त्या सृष्टीतल्या तारका, तारे आणि तंत्रज्ञ यांच्याविषयी (याच क्रमाने) जगभरातल्या समाजमनात कायम कुतूहल असते. त्यामुळे या विषयावर चिक्कार लेखन केले जाते. ते त्या त्या वेळी औत्सुक्याने वाचले जाते आणि नंतर विसरलेही जाते. या तात्कालिक लेखनाच्या पलीकडे जाऊन, अत्यंत गंभीरपणे, चित्रपटनिर्मिती ही एक सर्वसमावेशक कला आहे, हे लक्षात घेऊन, काही लेखकांनी टिकाऊ असे लेखन केले आहे. मराठीमध्ये अशोक राणे, बाबू मोशाय, अरुण खोपकर, अनिल झणकर ही अगदी सहजपणे सामोरी येणारी नावे आहेत. यातल्या काही लेखकांचा चित्रपटतंत्राविषयी सखोल अभ्यासच आहे आणि काही लेखकांचं ते प्रेम आहे. जगण्याचा एक भाग आहे. त्यांचे स्वतःचे विश्व चित्रपटांमुळे समृद्ध झाले आहे आणि ही समृद्धी त्यांनी मराठी वाचकांना दिलखुलासपणे वाटली आहे. अशा आस्वादक लेखन करणाऱ्या लेखकांच्या यादीत श्रीपाद ब्रह्मे हे नाव अलीकडेच समाविष्ट झाले आहे. वृत्तपत्रीय लेखन (चित्रपटांविषयी) ते गेली दहा-बारा वर्षं करीत आहेत. पण पुस्तकरूपाने त्या लेखनाचा परिचय अलीकडेच घडतो आहे. 'यक्षनगरी' हे सिनेमाविषयक लेखांचे त्यांचे दुसरे पुस्तक. ('फर्स्ट डे फर्स्ट शो' हे पहिले.) हे त्यांच्या अविचल सिनेमानिष्ठेचं दर्शन घडविणारं आहे, यात शंकाच नाही.
पुस्तकाची विभागणी दोन भागांत केली आहे. पहिला भाग 'सिनेमा ७० एमएम' अशा शीर्षकाखाली येतो, तर दुसऱ्या भागाचे शीर्षक आहे 'नक्षत्रे'. ही दोन्ही शीर्षके आपापला उद्देश निर्देशित करतात. पहिल्या भागात एकूणच 'सिनेमा' या माध्यमाविषयी चर्चा असली, तरी श्रीपाद ब्रह्मे हे चांगले गप्पिष्ट असल्यामुळे त्यांनी ती चर्चा कुठेही जड होऊ दिलेली नाही. त्यातल्या प्रकरणांची नावे जरी वाचली (सिनेमा - एक पाहणे, माध्यमांतर : रीम ते रीळ, मराठी सिनेमा - तंत्रातून अर्थाकडे, सिनेमॅटिक कलाटणी इ.) तरी हे सिनेपंतोजींनी घेतलेले बौद्धिक असावे, असा समज होतो. पण वाचत गेल्यानंतर विषय सोपा करून मांडण्याची लेखकाची हातोटी लक्षात येते. 'सिनेमा - एक पाहणे' या लेखात ते सिनेमाच्या निर्मितीचा प्रवास, सर्व अंगांचा विचार करून, विस्तारानं मांडतात. निर्मितीच्या प्रत्येक विभागाचे (डिपार्टमेंट) महत्त्व विशद करतात. त्यात 'दिग्दर्शक' या स्थानाचे श्रेष्ठत्व प्रामुख्याने नोंदले जाते. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 'आपल्याकडे चित्रपटसाक्षरता एकूणच कमी आहे' हे अत्यंत सत्य असे विधान ते परखडपणे मांडतात आणि लगेच त्याच्या सामाजिक कारणांचा उहापोहदेखील करतात. सामाजिक उलाढाल आणि चित्रपटसृष्टी यांच्या संबंधातली निरीक्षणे हे या संपूर्ण पुस्तकाचेच एक, अन्य ठिकाणी दुर्मिळ असलेले, वैशिष्ट्य आहे. या भागातले सर्वच लेख हे सिनेमासाक्षर करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहेत. 'रीम ते रीळ' या प्रकरणात साहित्यातल्या छापील अक्षरापासून ते पडद्यावर अवतीर्ण होण्यापर्यंतच्या प्रवासाची, खरे तर, 'मानसिकता'च मांडली आहे. त्यात सिनेमा कसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतो, याचे एक गणितच मांडून दाखवले आहे. 'तंत्रातून अर्थाकडे' या लेखात ब्रह्मे यांनी एक प्रमेय मांडले आहे. 'पूर्वी आपल्याकडे चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. तशी ती मराठी सिनेमातही होती आणि आहे. राजा परांजपे ते नागराज मंजुळे असं त्याचं थोडक्यात वर्णन करता येईल.' सिनेमाच्या अर्थकारणाचा विचार करताना, या विधानाचा परामर्ष घेतला गेलाच पाहिजे, इतके हे विधान लक्षवेधी आहे. विधानाच्या पुष्ट्यर्थ लेखकानं अनेक सामाजिक संदर्भ वापरले आहेत. थेट मल्टिप्लेक्सचा उदय आणि सिनेमाच्या अर्थकारणात झालेला फरक इथपर्यंत समग्र चर्चा या लेखात केली गेली आहे. जो भाग संबंधितांनी, मतभेद असले तरी, मुळातून वाचणे गरजेचे आहे. 'सिनेमॅटिक कलाटणी' आणि 'सांगत्ये ऐका ते सैराट' ही दोन शीर्षकेच आतल्या मजकुराविषयी बोलकी आहेत.
पुस्तकाच्या पूर्वार्धातील लेखनाशी अंमळ फटकून वागणारा लेख आहे 'लंचबॉक्स उघडून पाहताना!' असे असले तरी एक समीक्षणात्मक लेख म्हणून ते खटकत नाही. चित्रपट पाहणे हीदेखील एक कला आहे. 'लंचबॉक्स' नावाच्या हिंदी चित्रपटाची ही आस्वादक समीक्षा, चित्रपट कसा पाहावा, हे समजावून सांगते.
दुसरा 'नक्षत्रे' या नावाचा भाग चित्रपट तारे, तारकांच्या (आणि फक्त पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांच्याच) व्यक्तिचित्रणांचा आहे. त्यात (अर्थातच) अमिताभ बच्चन आणि मग अनिल कपूर, निळू फुले, माधुरी दीक्षित यांच्याविषयीचे लेख आहेत. लेखक या ताऱ्यांच्या प्रेमातच असल्यामुळे भक्तिभावाचा जास्त प्रादुर्भाव या लेखनाला झाला असावा, असे वाटते. अकाली निधन पावलेल्या मधुबाला, गुरुदत्त, मीनाकुमारी, संजीवकुमार, स्मिता पाटील यांच्यासारख्या सिनेकलावंतांवर श्रद्धांजली स्वरूपाच्या लेखांचा समावेशही याच भागात केला आहे. या सगळ्या व्यक्तिचित्रणांमध्ये नवीन असे काही नाही. पण काही निरीक्षणे मात्र उल्लेखनीय आहेत. उदा. अमिताभ बच्चन यांच्या एकंदर हिप्नॉटिझमबद्दल लिहिताना, ''कौन बनेगा करोडपती' या मालिकेतलं नव्वद टक्के यश हे केवळ त्यात बच्चन आहे यातच आहे' - असा उल्लेख येतो. निळूभाऊंच्या विषयी, 'खऱ्या आयुष्यातील माणूस नावाची भूमिका ते अगदी समरसून जगत होते. महात्मा फुल्यांचा वारसा सांगणारे एक सामाजिक अंग निळूभाऊंना होते' - अशी सार्थ टिप्पणी सहज समोर येते. 'सौंदर्य जर पाहणाऱ्यांच्या नजरेत असेल, तर खरोखरच ते चिरतरुण राहतं' हा माधुरी दीक्षितसंबंधित उल्लेख तसाच. 'कदाचित तिचं वयोवृद्ध होणं नियतीलाच मंजूर नसावं' हा मधुबालाच्या संदर्भातला उल्लेखदेखील यथायोग्य चटका लावणारा. 'स्मिता पाटील यांनी पुण्याच्या एफटीआयआयमध्ये शिक्षण घेतलं होतं,' हे विधान मात्र तपासून घ्यायला हवं! ही सगळी व्यक्तिचित्रणे करताना सामाजिक इतिहास, तत्कालीन घडामोडी आणि त्यांचा या कलाकारांच्या कार्यकर्तृत्वावर झालेला परिणाम; तसेच त्यांच्या लोकप्रियतेच्या आलेखाचा चढ-उतार यावर लेखकाने सखोल चिंतन केले आहे. चित्रपटप्रेमींना ते मननीय वाटेल यात शंकाच नाही. 'यक्षनगरी' या पुस्तकाचे यश त्यातच आहे.
समदा प्रकाशनाने पुस्तकाला बहाल केलेल्या देखणेपणालाही पुरेसे गुण जातात. श्री. ल. म. कडूंचे मुखपृष्ठ आणि जयदीप कडूंची निर्मिती तितकीच प्रशंसनीय.
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणी, २८ मे २०१७)
लहानपणापासून आपल्याला निरनिराळ्या कहाण्या ऐकायला आवडतात. मग त्या पुराणातल्या असोत किंवा गोष्टीच्या पुस्तकातल्या असोत किंवा आणखीन कुठल्या, त्या वाचताना आपण गुंग होऊन जातो हे मात्र खरंच. अशाच गुंग करणाऱ्या कहाण्या जेव्हा संगीत, वेगवेगळे स्पेशल इफेक्ट वापरून सिनेमाच्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर आपल्या समोर येतात, तेव्हा साहाजिकच त्या आपल्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यामुळे सिनेमा या गोष्टीबद्दल आपल्याला खूप अप्रूप आहे. त्यातल्या नट, नट्या, दिग्दर्शक, गायक, गीतकार ह्या साऱ्यांबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. ते प्रत्यक्षात कसे दिसतात? कसे काम करतात? त्यांची मतं काय आहेत? ते व्यक्ती म्हणून कसे आहेत? ह्या साऱ्या गोष्टी आपल्याकडे नेहमीच चर्चेचा, कौतुकाचा विषय ठरल्या आहेत. एक प्रकारचं 'ग्लॅमर' या क्षेत्रातल्या व्यक्तींना मिळतं. मग त्यामुळं प्रभावित होऊन नट, नट्यांची नावं आपल्या मुलांना देणं, निरनिराळ्या प्रॉडक्ट्सच्या जाहिरातीत त्यांचा वापर करणं असं सर्रास चालू असतं. कपडे, हेअर स्टाइल या सगळ्यावर सिनेमा इंडस्ट्रीचा प्रभाव पडतो. रोजच्या जगण्यात इतका प्रभाव टाकणारी ही इंडस्ट्री म्हणजेच श्रीपाद ब्रह्मे यांनी सांगितलेली 'यक्षनगरी' आहे.
जेव्हा केव्हा आपण अनोळख्या ठिकाणी फिरायला जातो तेव्हा आपल्याला एखादा मार्गदर्शक लागतोच. त्या ठिकाणची माहिती, त्यातील सौंदर्यस्थळे, महत्त्वाच्या गोष्टी, तिथे घडणाऱ्या हकिगती त्यानं आपल्याला सांगितल्या, की तो अनोळखी प्रदेश एकदम आपल्या परिचयाचा वाटू लागतो. त्याच्याकडं आपण लक्षपूर्वक आणि आस्थेनं पाहतो. त्यामुळे त्या स्थळाचा मनापासून आस्वाद घेता येतो. अगदी त्याचप्रमाणं या यक्षनगरीची सफर श्रीपाद ब्रह्मे घडवून आणतात. आपल्याकडे दर शुक्रवारी नवनवीन चित्रपट येतात. इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या चित्रपटांमधले नेमके कोणते सिनेमे बघावेत, काय दृष्टीनं ते बघावेत, असे प्रश्न आपल्याला पडतात. त्याबाबत खूप छान मार्गदर्शन आपल्याला या 'यक्षनगरी'त मिळतं. अगदी सिनेमा बघावा कसा यापासून ते या 'यक्षनगरी'ची जडणघडण कशी झाली, कोणकोणते चित्रपट या काळात बनले, ते का बनले, त्या काळात सामाजिक परिस्थिती कशी होती, नट-नट्यांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता अशा सगळ्या हकिगती तर आहेतच, शिवाय काही अजरामर झालेल्या चित्रपट तारे-तारकांचा व्यक्तिगत परिचयही यात दिला आहे.
'यक्षनगरी'ची निर्मिती ची कहाणी सांगताना लेखक म्हणतात, 'युरोपियन औद्योगिक क्रांतीमुळे तंत्रज्ञानाने झालेल्या बदलात सिनेमा नावाच्या तंत्रज्ञानाधारित कलेचा जन्म झाला. त्यामुळं माणसाचं जगणं पहिल्यासारखं राहिलं नाही. ल्यूमिए बंधूंनी पॅरिसमध्ये १८९६ साली जगातला पहिला सिनेमा दाखवला. त्यानंतर १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी 'राजा हरिश्चंद्र' हा चित्रपट बनवून मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. यानंतर बदल होत होत बोलपट, रंगीत चित्रं असं करता करता सिनेमानं भरपूर प्रगती केली आणि अजूनही नवं नवं तंत्रज्ञान येत आहेच. चित्रपटाच्या बदलत जाणाऱ्या यशापयशाच्या टप्प्यांचा एक आलेखच या नगरीद्वारे आपल्याला पाहायला मिळतो.
सिनेसृष्टीनं म्हणजेच 'यक्षनगरी'नं आपलं वर्चस्व काळाच्या ओघात कायम राखण्यासाठी जे काही व्रत अंगीकारलं आहे, त्यात काळाप्रमाणे कसे बदल केले आहेत ते लेखकानं सोदाहरण सांगितलं आहे. त्या त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीची जाणीव ठेवून, समाजमनाचा कल ओळखून चित्रपटांची निर्मिती झाली, असं लेखकाचं सांगणं आहे. उदाहरणार्थ, 'बिनधास्त' या सिनेमानं मराठी सिनेमाकडे बघण्याची पारंपरिक दृष्टी बदलवून टाकली. या सिनेमात एकही महत्त्वाचं पुरुष पात्र नव्हतं. ही मर्डर मिस्ट्री होती. यातील नायिका महाविद्यालयीन मुली होत्या, त्या आधुनिक होत्या, 'तुझी नि माझी खुन्नस...' म्हणणाऱ्या, नवीन पेहराव, फॅशन करणाऱ्या होत्या, 'दोन मित्रांची मैत्री जशी अतूट राहते तशी मैत्रिणींची का नाही राहत,' असं विचारणाऱ्या होत्या. त्या काळात आर्थिक सुधारणांमुळं शहरांत जे बदल घडत होते, त्याचं प्रतिबिंब या सिनेमात पडलं होतं. तसंच 'सातच्या आत घरात' या चित्रपटाबाबतही घडलं. या दोन्ही चित्रपटांनी तेव्हाची बदलती आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती अचूकपणे दाखविली. त्यामुळं या सिनेमांना लोकाश्रय मिळाला आणि मराठी सिनेमानं कात टाकली.
जसे चित्रपटाबाबत झालं, तसंच कलाकारांच्या आयुष्यातही या 'नगरी'नं खूप बदल घडविले. याच उत्तम उदाहरण म्हणजे राजा गोसावी. चौथीपर्यंत शिक्षण घेऊन मुंबईला मास्टर विनायक यांच्याकडे ऑफिसबॉय म्हणून त्यांनी काम केलं. पुढे सुतारकाम, मेकअपमन, प्रकाशयोजना, नंतर एक्स्ट्रा नट म्हणून काम केलं. नंतर त्यांना 'लाखाची गोष्ट'मध्ये काम मिळून ते नायक म्हणून खऱ्या अर्थाने काम करू लागले.
याचप्रमाणे सुपरस्टार अभिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीचाही आढावा घेण्यात आला आहे. ज्या वेळेस अभिताभ बच्चन सिनेक्षेत्रात आले तेव्हाची परिस्थिती कशी होती, अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतला महत्त्वपूर्ण टप्पा कोणता ते विस्तारपूर्वक सांगितले आहे.
बच्चन यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचा काळ म्हणजे सत्तरीचं दशक हे भारताच्या सांस्कृतिक इतिहासात नवनिर्माणाचं दशक म्हणून ओळखलं जातं. त्या काळात देशाची आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती चांगली सुखी, समाधानकारक म्हणावी अशी होती. महानगरातलं जीवन हे रसिलं असावं, असं दाखवणारे चित्रपट येत होते, त्यांना लोकप्रियता लाभत होती. परंतु १९७२ च्या दुष्काळाच्या तडाख्यानंतर मात्र देशाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीला वेगळीच कलाटणी मिळाली. एक असंतोषाचं, उद्वेगाचं वातावरण निर्माण झालं. तेव्हा त्या परिस्थितीला पोषक अशा 'अँग्री यंग मॅन'चा उदय होणं, हे अपरिहार्यच होतं. प्रत्यक्षात जरी नाही, तरी चित्रपट क्षेत्रात का होईना, असा अन्यायाविरुद्ध लढणारा, आत्मविश्वास असणारा, गुंडांना शासन करणारा नायक प्रेक्षकांना हवाच होता. अमिताभनं तो संतप्त तरुण नायक साकारल्यानं चित्रपटाच्या पडद्यावर तो यशस्वी ठरला. या साऱ्या कारकिर्दीत अमिताभ यांचा कसलेला अभिनय आणि देशातील स्थिती या साऱ्याचा परिणाम चित्रपट क्षेत्रावर झाला. याचप्रमाणे बदलणाऱ्या काळात निरनिराळे चेहरे आपल्या उत्तुंग अभिनयाने या 'यक्षनगरी'त चमकू लागले, त्यापैकी हिंदीतील अनिल कपूर, माधुरी दीक्षित, तर मराठीतील निळू फुले यांच्या कारकिर्दीचा आढावाही यात घेतला आहे.
'यक्षनगरी' ही अशी नगरी आहे, की जिथे तुमच्या कलागुणांची कदर केली जाते. अल्पावधीतच तुम्ही कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकता. समाजात तुमची एक प्रतिमा तयार होते. तुम्ही इथे किती काळ काम करता, हे केवळ महत्त्वाचे ठरत नाही, तर तुम्ही काय दर्जाचे काम करता त्याला महत्त्व मिळते. त्यामुळे काही काळ काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कलाकार जे आजही या 'नगरी'त असते, तर त्यांनी प्रेक्षकांना आनंद दिला असता, अशा अकाली निघून जाणाऱ्या कलाकारांच्या कारकिर्दीचाही वेध या पुस्तकात घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात मधुबाला, गुरुदत्त, मीनाकुमारी, संजीवकुमार, स्मिता पाटील यांचा समावेश आहे.
नित्यपाठातल्या कहाण्या ज्याप्रमाणे आपल्याला काही संदेश देऊ करतात, नीतिनियमांची जाणीव करून देतात त्याचप्रमाणे ही शुक्रवारची यक्षनगरीची कहाणी चित्रपट क्षेत्राकडे एका वेगळ्याच नजरेने बघायला शिकवते. चित्रपटक्षेत्र हे केवळ मनोरंजाचे साधन नसून ते बदलत्या काळाचे, सामाजिक घडामोडींचे प्रतिबिंब असते, ह्याची पुरेशी जाण आपल्याला करून देते.
(पूर्वप्रसिद्धी - साहित्यसूची, जून २०१७)
वृत्तसंपादक,
महाराष्ट्र टाइम्स‚ पुणे आवृत्ती
टाइम्स हाउस‚ ५७७‚ शिवाजीनगर‚
नामदार गोपाळ कृष्ण गोखले रोड 〈फर्ग्यसन रोड)‚ पुणे- ४